समर्थ विचार : विवेक


दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य | याचा करूं नये नास | 
दास म्हणे सावकास | विवेक पाहावा ||

आधी मनुष्यजन्म मिळणे दुर्लभ असते. त्यात दीर्घ-आयुष्य लाभणे आणखीन दुर्लभ होय. म्हणून असे मौल्यवान दीर्घायुष्य लाभले असता त्याचा नाश करू नये. मी रामदास म्हणतो की तुम्ही शांतपणे विवेकविचार करावा. जर उत्तम विवेक साधला नाही तर सारा मामला अविवेकाचा होतो आणि मग अविवेकी माणूस दीनवाणा/दरिद्री दिसतो. अशा या दीन स्थितीला तोच स्वतः जबाबदार असतो. उदासीन वृत्तीचा माणूस आळशी होतो, वाईट संगतीला लागून पाहता पाहता पार नागवला वा बुडवला जातो. सतत मूर्खपणाच्या वागणूकीमुळे अंगी बाष्कळपणा आला, पोरकटपणा वाढला, तरुणपणातील कामरूप चांडाळाने घाला घातला असे होते. असा हा मूर्ख, आळशी आणि तरुण माणूस सर्वच दृष्टीने दीनवाणा होऊन राहतो. त्याला कोणाकडून कांहीही आधार मिळत नाही, याला काय म्हणावे ! जीवनाला जे जे आवश्यक असते, त्यापैकी काहीच त्याच्याजवळ नसते. साध्या अन्न आणि वस्त्रालाही तो मोताद होतो, पारखा होतो. अंतर्यामी एकही उत्तमगुण नाही की कांहीच नाही. धड नीट बोलतां येत नाही की, बसतां येत नाही. प्रसंग वगैरे काहीच कळत नाही, शरीर आणि मन अभ्यासाला वळत नाही, अशी दयनीय अवस्था होत असते. लिहिणे वा वाचणें नाही; कोणाला काही विचारणे वा सांगणें नाही, बाष्कळपणामुळे नियमितपणाचा अभ्यास नाही.


Comments